माझे, आमचे, सर्वांचे राजन खान

ज्यांनी आपली संपूर्ण हयात लिहिण्यात, वाचण्यात, बोलण्यात, उपक्रम घेण्यात घालवली त्यांच्याबद्दल माझ्यासारखा काहीच न लिहिणारा माणूस लिहितोय…

१/८/२०१६ रोजी राजन खान आमच्या कॉलेजवर व्याख्यान देण्यासाठी आले होते. ते नाव प्रथमच ऐकत होतो. पण जसंजसं व्याख्यान पुढे सरकत होतं, कळत होतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून काय जाणार नाही. माझं वाचन त्या काळात कमी होतं, पण चळवळीतले काही मित्र होते. पुरोगामी विचार, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्यता याबद्दल जागरूक होतो. पण सर जे बोलत होते ते काहीतरी वेगळंच होतं. अगोदर कधी न ऐकलेलं असं. ते म्हणाले मी ‘माणूस’ आहे. मी हसलो. पुढे ते ‘माणूस’बद्दल जे सांगत राहिले, मग मात्र हरवून गेलो. ते करुणेचं, समाज शांत, सुखी, भेदरहित करण्याचं बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून अक्षर मानव बद्दल माहिती मिळाली. मनापासून आवडलं ते काम. पुणे कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. पुढे अक्षर मानवमध्ये सक्रिय सहभाग नोंदवू लागलो.


बाबांसोबत खूप फिरायला भेटलं. त्यांचं ऐकायला भेटलं. खूप सहवास लाभला. त्यांच्याशी गप्पा (एकतर्फी) म्हणजे आमचा नादच. संपूर्ण राजन खान अनुभवायचे असतील तर बैठकांना, संमेलनांना येत चला. व्याख्यान ऐकण्यापेक्षा त्यांच्यासोबत गप्पा मारणे म्हणजे भन्नाटच अनुभव. असे भन्नाट अनुभव दररोज घेत असतो आम्ही. त्यांना खूप मनसोक्त हसताना पाहिलंय. माणसांबद्दल बद्दल बोलताना, आम्हा लेकरांची काळजी करताना अगदी रडताना पण पाहिलंय. काही त्यांना बाबा म्हणतात, काहीजण गुरुजी, सर, डॉक्टर, मालक. मी समोर तर आणखी सरच म्हणतो. पहिल्यांदा ते रागीट वाटायचे म्हणून ‘सर’. पहिला प्रभाव शेवटपर्यंत टिकतो.

सरांचा मतानुसार माणसांच्या जगात पाच गोष्टी आहेत ज्या नष्ट झाल्या पाहिजेत. देव, जात, धर्म, लिंगभेद, भ्रष्टाचार. हे मी अगोदरपासूनच पाळत होतो पण आपल्या सारखे असे येडे आणखीन आहेत हे कळल्यावर लै आनंद झाला. माझं पहिले संमेलन एकांकिका संमेलन, मोढवे(बारामती). मला एकांकिका म्हणजे काय हे तिथं गेल्यावर कळलं. पण मला या ‘माणसांना’ भेटायचं होतं म्हणून जाण्याचा अट्टहास. रमलोच राव या लोकांमध्ये. अक्षर मानव ही संवाद आणि गप्पा यांवर आधारित संघटना आहे. जगातले खूप प्रश्न निव्वळ, निखळ संवादाने सुटू शकतात यांवर आमचा विश्वास आहे. आमची संमेलनं फार मोकळी ढाकली असतात. गप्पा, चर्चासत्र, अनुभव. आणि रात्रीला शेकोटी लागतेच बरं. या समाजासाठी(कुठेतरी स्वार्थ) आम्ही त्यासाठी राबत आहोत, राबत राहू.

एक किस्सा आहे. मी जेव्हा पुणे सोडून लातूरला कायमचा परतणार होतो. शेवटच्या दिवशी सरांना भेटायला कार्यालयात गेलो. सरांना कल्पना दिली की पुणे सोडतोय. सरांनी ते दाखवलं नाही पण त्यांना वाईट वाटत होतं. ते म्हणले राहा, काही तर करू आपण तुझ्या पोटा पाण्याचं इथेच. शेवटी निघताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं. पहिल्यांदा सरांनी मला मिठी मारली. हायसं वाटलं एकदम.

अक्षर मानव कुटुंबाबद्दल बोलताना यातल्या ‘माणसांबद्दल’ बोलायला मी कसा विसरणार? खूप जिवलग ‘माणसं’. एकदम अनोळखी देखील दोन तीन दिवसांच्या संमेलनात जिवलग होऊन जातात. दररोज या कुटुंबात सामील होत आहेत. कुणाच्या आजारपणात धावून येणारी, मदतीला एका हाकेवर येणारी. मदत कशीही असो आर्थिक, शारीरिक, मानसिक आम्ही मागे पडत नाही. आम्ही याला कुटुंब म्हणतो. 

सरांची मी बरीच पुस्तके वाचली आहेत. अगोदर तेच तेच motivational वगैरे वाचायचो. कथा, कादंबऱ्याची आवड मात्र गुरुजींमुळे लागली. त्यांच्या कथा खूपच आवडतात. काही आवडती पुस्तकं म्हणजे सतनागत, फैल रात्र, यतीम, इह, कथा आणि कथेमागची कथा. त्यांच्या काही कथा- कादंबऱ्यांवर चित्रपट, नाटक झालेली आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावेच खूप आकर्षित असतात हे सर्वज्ञात आहे. त्यातला मजकूर, गाभा पण दर्जेदार असतो. त्यांची पुस्तके आता मिळवायला कष्ट ही खूप घ्यावे लागतात. कारण, खूप सारी पुस्तके out off print आहेत. तरी मी शोधत आहे, वेळ मिळेल तसा वाचत आहे. सर नेहमी सर्वांना सांगत आलेत लिहिते व्हा. काय माहित का पण मला कधी सांगितलं नाही!

माझ्या परिवारात, नातेवाईकांत, मित्रांत ही चर्चा चालते की अनिकेत काही तरी वेगळंच करतो. समाजात राहायचं सोडून समाजाला सुधारवायचं काम करायला निघालाय. कुणाच्या नादी लागला? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे खरंच नाहीये. आम्ही कुणाचं वाईट करत नाही. मी यात रमतो ते स्वतःसाठी, कारण मला यात आनंद भेटतो. शेवटी ही पृथ्वी माझी आहे, यासाठी मी काम करणार. 

तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्याविना पण तुम्हा आम्हा सर्वांसाठीच.

                           अक्षर मानव कुटुंब 

                       राजन खान @जोश_talk